जळगाव शहरात मेहरूण तलावात घडली घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील मेहरूण तलाव येथे मासेमारी करण्यास गेलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काझी अब्दुल वाहिद रईस अहमद (वय ४५, रा. फातिमा मस्जिद जवळ, मेहरूण, जळगाव) असे मयत प्रौढाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी असा परिवार आहे. मशिदीत काम करून परिवाराचे ते उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान मंगळवार दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी ते मेहरूण तलाव येथे मासेमारी करण्यास गेले होते. त्यावेळेला अचानक तोल जाऊन पाण्यात पडले व बुडाले. त्यांचा परिवार त्यांचा शोध घेत होता. दरम्यान बुधवारी संध्याकाळी त्यांचा मृतदेह तलावात तरंगताना आढळून आला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृतदेह पाठविला. रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. रुग्णालयात समाजातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.