जामनेर तालुक्यात अधिकाऱ्यांच्या पाहणीदरम्यान चित्र
जळगाव (प्रतिनिधी) : वाकोद येथील आरोग्य केंद्रामध्ये अस्वच्छता दिसल्याचे पाहून सीईओ मीनल करणवाल यांनी भेट दिल्यावर तीव्र नाराजी व्यक्त करून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. त्यानंतर आता केंद्रामध्ये स्वच्छता करण्यात आली असून सर्व केंद्र चकचकीत झाले आहे.
जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दि. ३० सप्टेंबर रोजी जामनेर तालुक्यातील दौऱ्यादरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र, वाकोद येथे भेट दिली. यावेळी आरोग्य केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आरोग्यासारख्या संवेदनशील सुविधा देणाऱ्या ठिकाणी स्वच्छतेचा दर्जा उत्तम असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच तत्काळ स्वच्छता करण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना ठोस सूचना दिल्या.
त्यानंतर तात्काळ कार्यवाही करत प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोद येथे स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. केंद्र परिसरात तसेच रुग्णालयाच्या इमारतीत व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या या सक्त निर्देशांमुळे आरोग्य केंद्रात आवश्यक सुधारणा होत असून रुग्ण व नागरिकांना स्वच्छ वातावरणात आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.