गांधी जयंतीच्या कार्यक्रमात विजेत्यांना पारितोषिक वितरण
जळगाव ( प्रतिनिधी) : येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने ३० सप्टेंबर रोजी कांताई सभागृहात आयोजित ‘गांधीतीर्थ देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा’ उत्साहात संपन्न झाली. शहरी आणि ग्रामीण अशा दोन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत एकूण १९ संघांनी सहभाग घेतला. देशभक्तीच्या गीतांनी सभागृह भारावले आणि उपस्थितांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. सर्वप्रथम डॉ. स्मिता पाटील यांच्याहस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेला माल्यार्पण झाले. स्पर्धेच्या परीक्षक विशाखा देशमुख, वृषाली जोशी आणि यांनी सहभाग घेतला.
स्पर्धेच्या प्रारंभी परीक्षक विशाखा देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “संगीत माणसाला आनंद आणि समाधान देते. ते ईश्वराशी संवाद साधण्याचे साधन आहे. सूर, ताल आणि लयीचा समन्वय तसेच सामूहिकतेची भावना संघाला यश मिळवून देते.” त्यांच्या या प्रेरणादायी शब्दांनी सहभागी संघांचा उत्साह वाढला. प्रत्येक संघाने देशभक्तीने प्रेरित गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकली. सादरीकरणात गांधीजींच्या अहिंसा, सत्य आणि स्वदेशीच्या विचारांचा प्रभाव दिसून आला.
स्पर्धेत सहभागी सर्व संघांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश कुळकर्णी यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सुधीर पाटील, अशोक चौधरी, चंद्रशेखर पाटील, प्रशांत सूर्यवंशी, चंद्रकांत चौधरी आणि विक्रम अस्वार यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेच्या विजेत्यांना महात्मा गांधी जयंतीच्या कार्यक्रमात २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता महात्मा गांधी उद्यानात पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.