जळगाव तालुक्यातील विदगाव पुलावरील घटना, कार नदीत कोसळली
जळगाव (प्रतिनिधी) : जळगावहून भरधाव वेगाने चोपड्याकडे जाणाऱ्या वाळूच्या भरलेल्या डंपरने समोरून येणाऱ्या एका चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. तालुक्यातील विदगाव येथील तापी नदीच्या पुलावर मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यात एकाच कुटुंबातील आई व मोठा मुलगा जागीच ठार झाला असून पती व लहान मुलगा हे गंभीर जखमी झाले आहेत. शासकीय रुग्णालयात नातेवाईकांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
अपघातानंतर चारचाकी वाहन थेट तापी नदीपात्रात कोसळले. हे चारचाकी वाहन जळगाव शहरातील विठ्ठल नगर येथील शिक्षक निलेश प्रभाकर चौधरी (वय ३६) यांचे होते. चौधरी परिवार चोपडा येथे देवीच्या दर्शनाकरिता गेला होता आणि परतीच्या प्रवासात विदगाव पुलावर त्यांच्यावर काळाने घाला घातला.(केसीएन)अपघातात निलेश चौधरी आणि त्यांचा धाकटा मुलगा ध्रुव निलेश चौधरी (वय ४) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर, निलेश चौधरी यांच्या पत्नी मीनाक्षी निलेश चौधरी (वय ३३) आणि मोठा मुलगा पार्थ निलेश चौधरी (वय १२) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. निलेश चौधरी हे धानोरा येथील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.तर मयत मीनाक्षी चौधरी या शिवाजीनगर मधील पाटणकर शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
या अपघातानंतर वाळूने भरलेला डंपर पुलावर आडवा पडल्यामुळे दोन्ही बाजूंनी येणारी-जाणारी वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. चोपड्याकडून जळगावकडे येणारी तसेच जळगावहून चोपड्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेमुळे जळगाव शहरात शोककळा पसरली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांसह मित्रपरिवाराने मोठ्या प्रमाणात आक्रोश करीत शोक व्यक्त केला. जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली व जखमींना उपचारासाठी नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात हलवले.