जळगाव शहरासह, मध्यप्रदेशातील गुन्ह्यांमध्ये अटक
जळगाव (प्रतिनिधी) : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मालमत्तेविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन यांनी संयुक्तपणे भुसावळ येथील ईराणी वस्ती ‘पापा नगर’ येथे अचानक ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवले. या कारवाईत अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या २ सराईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

या विशेष कारवाईमध्ये दि. ३० रोजी केलेल्या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) आणि पोलीस निरीक्षक राहुल वाघ (भुसावळ बाजारपेठ) यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पापा नगर येथील रझा टॉवर भागाला लक्ष्य केले. कोंबिंग ऑपरेशनदरम्यान दोन रेकॉर्डवरील आरोपी घरी हजर मिळून आले आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले. यात तालीब अली रशीद अली (वय २०, रा. रझा टॉवर, पापा नगर, भुसावळ) आणि मोहम्मद अली लियाकत अली (वय ३५, रा. रझा टॉवर, पापा नगर, भुसावळ) यांना अटक करण्यात आली आहे.
सखोल चौकशीअंती दोन्ही आरोपी विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असल्याचे उघड झाले. तालीब अली रशीद अली: हा एमआयडीसी पो.स्टे. (गु.नं. १५१/२०२५, कलम ३०३(२)) आणि वरणगाव पो.स्टे. (गु.नं. ६२/२०२५, कलम ३०३(२)) येथे दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये फरार होता. त्याला पुढील तपासकामी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. मोहम्मद अली लियाकत अली: हा वारला पो.स्टे., जिल्हा बडवाणी (मध्यप्रदेश) (गु.नं. ३५३/२०२४, कलम ३१८(४)) येथे दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार होता. तसेच, त्याच्यावर हातचलाखीने फसवणूक करणे आणि जबरी चोरी यांसारखे मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला पुढील तपासकामी वारला पोलीस स्टेशनच्या (मध्यप्रदेश) ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्हा केल्यानंतर बरेच दिवस हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. पोलिसांच्या संयुक्त आणि अचानक केलेल्या या कारवाईमुळे ते जेरबंद झाले आहेत. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये स.पो.नि. नितीन पाटील, पो.उप.नि. सोपान गोरे, पो.उप.नि. राजू सांगळे, म.पो.उप.नि. भारती काळे, श्रेणी पो.उप.नि. रवी नरवाडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ बाजारपेठ येथील अधिकारी व अंमलदार सहभागी होते.









