जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात दहशत निर्माण करणारा व गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात सराईत गुन्हेगार समीर हनीफ काकर (वय २२, रा. तांबापुरा, जळगाव) याला एम.पी.डी.ए. कायद्यान्वये पुणे येथील येरवाडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
समीर काकर हा एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याचे तांबापुरा, मेहरुण आणि जळगाव परिसरात दहशत माजवित होता. सामान्य नागरिकांना विनाकारण मारहाण करणे, शिवीगाळ करणे, तसेच साथीदारांसह खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबर दुखापत करणे आणि घरफोडी अशा स्वरूपाचे एकूण १३ गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांचा आलेख पाहता, त्याला यापूर्वी एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते.
समीर काकरच्या वाढत्या गुन्हेगारीवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी एम.आय.डी.सी. पोलीस स्थानकाचे तात्काळ पाऊल उचलले. त्यांनी एम.पी.डी.ए. कायद्याखाली स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडे पाठवला. पोलीस अधीक्षकांनी सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर केला. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन, ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी समीर हनीफ काकर याला येरवाडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले.
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश प्राप्त झाल्यापासून समीर काकर हा पोलिसांच्या हाती लागत नव्हता, तो फरार झाला होता. मात्र, २४ सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, समीर काकर पुणे येथे लपून बसला आहे. त्यानुसार, त्यांनी त्वरित एम.आय.डी.सी. पोलीस स्थानकाच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पो.ना. प्रदीप चौधरी, पो.कॉ. विशाल कोळी आणि गणेश ठाकरे यांचे विशेष पथक तयार करून पुणे येथे रवाना केले.
या पथकाने पुणे येथे आरोपीचा कसून शोध घेत गुरूवारी २५ सप्टेंबर रोजी समीर काकरच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला तातडीने येरवाडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबद्ध केले. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली आहे.