यावल पोलीस स्टेशनची राज्य मार्गावर कारवाई
यावल ( प्रतिनिधी ) – शहराबाहेर अंकलेश्वर बर्हाणपूर राज्यमार्गावर दहिगाव फाट्याजवळ ३४ वर्षीय तरुणांकडून १ व्यक्ती गावठी बनावटीचे पिस्टल खरेदीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर यावल पोलिसांनी दोघा आरोपींना गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले. संशयीत दोघांना यावल न्यायालयाने २८ सप्टेंबरपर्यंत ४ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपीने आणखी काहींना शस्त्र विक्री केल्याचा संशय आहे.
यावल शहरातील बोरावल गेट जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील रहिवाशी युवराज उर्फ युवा राजू भास्कर (वय ३४) हा तरुण भूषण कैलास सपकाळे (वय ३१, वराडसीम, ता.भुसावळ) या तरुणाला गावठी बनावटीचे पिस्टल विक्री करीत असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला.
बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावरील दहिगाव फाट्याजवळ संशयीत येताच पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तोल, दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या तरुणांना अटक करण्यात आली.
दोघांना गुरुवारी न्यायालयात प्रथम वर्ग न्या.आर.एस. जगताप यांच्या न्यायासनासमोर हजर केले असते दोघांना २८ सप्टेंबरपर्यंतची ४ दिवसाची पोलिस कोठडी सुनवण्यात आली. तपास पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.