भुसावळ शहरातील घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ येथील एका सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला ‘डिजिटल अरेस्ट’ या नव्या क्लृप्तीचा वापर करून तब्बल १९ लाख ९५ हजार रुपयांहून अधिक रकमेला गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बुधवार, २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फसवणुकीचे बळी ठरलेले नागरिक सुरेश नथ्थु धांडे (वय ६९, रा. प्रोफेसर कॉलनी, भुसावळ) हे रेल्वे विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. १७ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीत ही घटना घडली. सायबर चोरट्यांनी धांडे यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आणि व्हॉट्सअॅपवर कॉल व व्हिडिओ कॉल केले. चोरट्यांनी धांडे यांना सांगितले की, त्यांचे आधारकार्ड मुंबईतील अंधेरी येथील कॉसमॉस बँकेच्या एका खात्याशी लिंक आहे आणि त्या खात्यात २ कोटी ५० लाख रुपये ‘अतिरेक्यांनी’ पाठवले आहेत.
या सायबर गुन्हेगारांनी धांडे आणि त्यांच्या पत्नीला व्हिडिओ कॉलवर समोरासमोर बसवून, त्यांना तातडीने घराचे दरवाजे, खिडक्या बंद करण्यास सांगितले. “तुम्हाला आणि तुमच्या मुलाला अटक केली जाईल. आम्ही विचारल्याशिवाय व्हिडिओ कॉल बंद करायचा नाही, कुठे जायचे नाही,” अशी सक्त धमकी देत आरोपींनी त्यांच्या मनात प्रचंड दडपण निर्माण केले.
या भीतीपोटी धांडे यांनी आरोपींच्या सर्व सूचनांचे पालन केले. यानंतर आरोपींनी त्यांच्या बँक ऑफ इंडियामधील खात्यातून १९ लाख ९५ हजार रुपये आरटीजीएसद्वारे लुधियाना येथील सिटी युनियन बँकेच्या एका खात्यात तात्काळ ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच धांडे यांनी तातडीने दुसऱ्याच दिवशी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करत आहेत.