धरणगाव शहरातील परिहार चौकातील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) : शहरातील परिहार चौकात राहणाऱ्या वृध्द महिलेच्या अंगावर पावसामुळे ओली झालेली भिंत कोसळल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी २३ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. धरणगाव ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

परिहार चौकात सरूबाई चैत्राम धनगर (वय ६५) या वृध्द महिला पती आणि दिव्यांग मुलीसोबत वास्तव्याला आहेत. त्यांचे घर हे जुने मातीचे असल्याने गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे त्यांच्या घरची भिंत ओली होती. मंगळवारी २३ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता नेहमी प्रमाणे सरूबाई धनगर या महिला घरात काम करत असतांना अचानक त्यांच्या आंगावर घराची भिंत कोसळली. त्यावेळी घरात असलेले पती चैत्राम धनगर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. त्यावेळी शेजारी राहणाऱ्यांनी धाव घेवून वृध्द महिलेला बाहेर काढले व धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत त्यांच्या डोक्याला, छातीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी महिलेच्या परिवाराला शासकीय मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.









