रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : येथील अनुराग स्टेट बँक कॉलोनीत अपार्टमेंटमधील २ फ्लॅटच्या मुख्य दरवाजांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरांमधून सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण ६ लाख ३७ हजार ५५० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घरफोडी १९ सप्टेंबर रोजी अनुराग स्टेट बैंक कॉलनीत उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
अनुराग स्टेट बैंक कॉलनीतील ब्रीज हाइट्स अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर राहणारे दीपक परदेशी हे खासगी वकिलाकडे नोकरी करतात. ते ७ सप्टेंबर रोजी कुटुंबीयांसह सुरत येथे गेले होते. तसेच तिसऱ्या मजल्यावर राहणारे दिनेश बाबूराव गोडंबे सप्टेंबर रोजी फत्तेपूर येथे गेले होते. दोन्हीही फ्लॅट बंद असताना चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप, सेंट्रल लॉक तोडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले. चोरट्यांनी परदेशी यांच्या घरातील कपाटामधील रोख ४० हजार रुपयांसह २२ तोळे सोन्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, ३२५ ग्रॅम चांदीचे दागिने, असा एकूण तीन लाख ९३ हजार ५० रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला, तसेच गोडंबे यांच्या घरातील कपाटामधून १६ तोळे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन लाख ४४ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. घटनास्थळी रामानंदनगर पोलिसांसह श्वान पथक व फॉरेन्सिकचे पथक दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाहून ठसे गोळा केले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.