भुसावळ तालुक्यात साकेगाव येथे शोककळा
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील साकेगाव येथील रहिवासी युवक शुक्रवार दि.१९ रोजी म्हशी चारण्यासाठी गेला असता तो वाघूर नदीच्या प्रवाहात वाहून गेला होता. ही घटना सकाळी ९ वाजता घडली होती. घटना घडल्यापासून साकेगावच्या युवकांनी नदीत शोधण्याचे प्रयत्न केले, मात्र तो सापडला नाही. शनिवार दि. २० रोजी गावापासून चार किलोमीटर लांब जोगलखेडा वाघूर नदी पात्रात सकाळी ७ वाजता मृत्यूदेह मासेमारी करणाऱ्या व्यवसायिकांना आढळून आला.
लक्ष्मण वसंत ठाकरे (वय २५, रा. साकेगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात २ भाऊ, १ बहीण असा परिवार आहे.कुटुंबाचा तो कर्ताधर्ता असल्याने लक्ष्मणच्या मृत्यूमुळे परिवारावर मोठा आघात कोसळला आहे. शुक्रवारी लक्ष्मण ठाकरे म्हशी चारण्यासाठी वाघूर नदीवरील जुन्या पुलावरून नदीच्या पलीकडे गेला होता.(केसीएन)पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न झाल्यामुळे लक्ष्मण ठाकरे हा वाहून गेला होता. तब्बल सात ते आठ तासापर्यंत शोधकार्य करूनही तो सापडला नाही.
अखेर दुसऱ्या दिवशी शनिवार दि. २० रोजी सकाळी ७ वाजता जोगलखेडा येथे मासे व्यवसायिक हे नदीपात्रात मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांना लक्ष्मणचा मृतदेह नदीपात्राजवळ आढळला. घटना घडल्यानंतर महसूल प्रशासनाच्या माध्यमातून एनडीआरएफच्या टीमला माहिती कळविण्यात आली होती, मात्र टीम पाचोरा येथे गेली होती असे सांगण्यात आले. विषेश म्हणजे साकेगाव तलाठी कार्यालय येथे सद्यस्थितीत दोन तलाठी कार्यान्वित आहे. परंतु घटनास्थळी एकही तलाठी पोहोचला नाही म्हणून ग्रामस्थांकडून घटनास्थळी संताप व्यक्त करण्यात आला.