जळगाव शहरातील खोटे नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : रिक्षात बसलेल्या प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याजवळील १८ हजारांची रोकड जबरीने हिसकावून घेतल्याची घटना खोटेनगर स्टॉपजवळ घडली. त्यानंतर येवले यांना रिक्षातून उतरवून ते पसार झाले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगदिश भालचंदद्र येवले (वय ३७, रा. खोटेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. शहरातील खोटे नगरात जगदिश येवले परिवारासह राहतात. आईस्क्रीम पार्लरचा त्यांचा व्यवसाय आहे. दि. १४ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दुकानावर जाण्याकरीता खोटेनगर स्टॉपवर रिक्षाची वाट पाहत उभे होते. यावेळी पाळधीकडून येणाऱ्या रिक्षाला त्यांनी हात दिला. रिक्षा चालकाने रिक्षा थांबवून दादावाडी जाण्यास होकार दिल्याने जगदिश येवले हे रिक्षात बसले. यावेळी अगोदर रिक्षात दोन प्रवासी बसलेले होते.
येवले हे रिक्षात बसत असतांना रिक्षात असलेल्या एका इसम खाली उतरला त्याने माझ्या पायाला दुखापत झाली आहे असे सांगून त्याने येवले यांना मध्यभागी बसवले. रिक्षा खोटेनगर स्टॉपजवळून काही अंतरावर गेल्यानंतर रिक्षात बसलेल्या इसमांनी येवले यांना धारदार चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील १८ हजारांची रोकड जबरीने काढून घेतली. त्यानंतर येवले यांना रिक्षातून उतरवून ते चोरटे तेथून पसार झाले. सहा दिवसानंतर त्यांनी तालुका पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.