बालक गंभीर जखमी, जळगावातील मेहरूण येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मेहरूण भागात घराच्या गच्चीवर सुकायला टाकलेली गोधडी काढायला गेलेल्या बालकाला घराजवळून गेलेल्या वीजवाहक तारांचा स्पर्श होऊन तो गंभीर जखमी झाला. इतर दोन जणांनाही इजा झाल्याचे सांगण्यात आले. ही घटना शनिवारी दि. २० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मेहरुण परिसरात घडली.
अजय बुधा सोनवणे (वय १४, रा. मेहरुण) असे जखमी बालकाचे नाव आहे. गच्चीवर धुतलेल्या गोधड्या काढण्यासाठी अजय गेला होता. दरम्यान, गच्चीजवळून वीजवाहक तारा गेलेल्या आहेत. त्या तारांचा स्पर्श झाला व अजय त्याला चिटकला. हा प्रकार आजूबाजूच्या मंडळींच्या लक्षात आला. त्या वेळी लाकडी काठीच्या आधारे अजयची सुटका करून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेमुळे मेहरूण येथे मोठी गर्दी झाली होती. तर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती.