पाचोरा तालुक्यातील खळबळजनक घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील हिवरा नदी पात्रात पाय घसरल्याने १४ वर्षीय मुलगी वाहून गेल्याची धक्कादायक घटना आज दि. १९ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुलीच्या आजोबाना धक्का बसून त्यांनी प्राण सोडल्याचेही समोर आले आहे. यामुळे पाचोरा तालुक्यात शोककळा पसरली आहे.


निकिता संतोष भालेराव (वय १४, रा.वडगावटेक ता. पाचोरा) असे बेपत्ता मुलीचे नाव आहे. पाचोरा तालुक्यातील वडगावटेक परिसरात असलेल्या हिवरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. हि १६ वर्षीय मुलगी तिची आत्या सरला विलास पाटील (वय ३७, रा. वडगावटेक ता. पाचोरा) हिच्यासह कपडे धुण्यासाठी नदीपात्राजवळ गेले होते.(केसीएन)यावेळी नदीपात्रात पाय घसरला आणि ते दोघे वाहू लागले. सुदैवाने सरला हिस वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र निकिता पुरात वाहून गेली आहे. निकिताला शोधण्याचे काम युद्ध पातळीवर ग्रामस्थ करीत आहेत.
सुरुवातीला कोणतीही शासकीय मदत यंत्रणा घटनास्थळावर वेळेवर पोहोचली नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. तालुक्यात पूरस्थिती निर्माण झालेली असताना अशा कठीण प्रसंगीही संबंधित यंत्रणा सज्ज नसल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला.दुपारनंतर पाचोरा नगरपालिका, अग्निशमन यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण टीम घटनास्थळी दाखल झाली. पाचोरा पोलीस स्टेशनचे हेकॉ भगवान उमाळे, नाईक महेंद्र पाटील, कॉन्स्टेबल श्रीराम शिंपी यांनी घटनास्थळी माहिती घेतली. तर परिस्थितीवर पोलीस लक्ष ठेऊन आहेत.दरम्यान, निकिता आणि मुलगी सरला पाटील या वाहून गेल्याचे समजताच तिचे आजोबा शामराव विठ्ठल खरे (वय ७२) यांना जोरात मानसिक धक्का बसला आणि त्यातच त्यांचेही वडगाव टेक गावात राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरु होते.









