जळगाव जीएमसीसह सामाजिक कार्यकर्त्यांची वैद्यकीय सेवा
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे रेल्वेतून पडून गंभीर जखमी रुग्णाला गेल्या चार महिन्यांपासून उपचार सुरु होते. उपचार पूर्ण झाल्यावर गुरुवारी दि. १८ सप्टेंबर रोजी त्याला रुग्णालयातून निरोप देण्यात आला. परिवारातील सदस्याप्रमाणे चांगली वर्तणूक रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी यांचेकडून मिळाल्याने रुग्णाने आभार मानले.
राजेश भगवान (रा. कानपूर, उत्तर प्रदेश) हे गावी जात असताना रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाले होते. सुरुवातीला त्यांची ओळख पटत नव्हती. त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला अतिदक्षता विभाग व त्यानंतर जनरल कक्षात त्यांच्यावर गेली ४ महिने उपचार करण्यात आले. यादरम्यान, ओळख पटल्यावर राजेश भगवान यांच्या नातेवाईकांना बोलाविण्यात आले. मात्र त्यांनी येण्यास नकार दिला होता. अखेर, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी शुश्रूषा केली.
उपचार पूर्ण झाल्यावर गुरुवारी दि. १८ रोजी रुग्णालयातून उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण यांच्या उपस्थितीत निरोप देऊन उपचाराअंती त्यांना त्यांच्या मूळ गावी उत्तरप्रदेशात पाठवण्यात आले. यावेळी समाजसेवा अधीक्षक अनिल ठाकरे, दिपाली जाधव आणि ऐश्वर्या त्रिभुवन, कर्मचारी शकील पठाण उपस्थित होते. विशेष म्हणजे, या सर्व व्यवस्थेसाठी दानशूर सामाजिक कार्यकर्ते इसाक बागवान यांनी रुग्णासाठी रेल्वे तिकिटाची आणि जळगाव ते भुसावळ रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी रुग्णास सहकार्य करणाऱ्या डॉक्टर्स, कर्मचारी, परिचारिका यांचेसह सामाजिक कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे.