जळगाव ( प्रतिनिधी ) – स्व. सौ. गोदावरी आई पाटील यांच्या स्मरणार्थ डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालय, जळगाव यांच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबाद येथे भव्य मोफत फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव जाधव व डॉ. अजय पाल यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अशा शिबिरांमुळे गावकर्यांना आरोग्यसुरक्षेची जाणीव होते आणि आरोग्य विषयक समस्या वेळेत ओळखून त्यावर योग्य उपचार मिळतात, असे प्रतिपादन केले.शिबिरात आलेल्या रुग्णांची सविस्तर तपासणी करून त्यांना विशेषतः सांधेदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, स्नायूंच्या समस्या तसेच पक्षाघातग्रस्त रुग्णांसाठी शारीरिक व्यायाम, उपचार पद्धती व आरोग्यदायी जीवनशैली याविषयी माहिती देण्यात आली. या शिबिरात मोठ्या संख्येने गावकरी सहभागी झाले. या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी श्री. राहुल गिरी, डॉ. अमीत जैस्वाल, डॉ. आशीष पाटील, डॉ. दिव्या पाटील, डॉ. मनोज सूर्यवंशी, डॉ. पवन चोपडे, डॉ. अश्विनी मालोकार, डॉ. जिज्ञासा अत्तरदे, डॉ. तेजल सोनवने तसेच महाविद्यालयातील इतर विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. शिबिराचा उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे व फिजिओथेरपीच्या माध्यमातून विविध आजारांविषयी जनजागृती करणे हा होता.