जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव येथील जैन हिल्स वरील सुबीर बोस हॉल मध्ये उत्तर व मध्य महाराष्ट्रातील क्रिकेट पंचाच्या कार्यशाळेचे आयोजन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे दि. १३ व १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान करण्यात आले होते. या कार्यशाळेत ४५ जळगाव सह नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, तसेच छत्रपती संभाजी नगर येथील पंच सहभागी होते. कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून सर्वश्री अजय देशपांडे, (छत्रपती संभाजी नगर) संदीप चव्हाण (नाशिक), मंगेश नार्वेकर (रत्नागिरी) व संदीप गांगुर्डे (जळगाव) यांचा समावेश होता.
या दोन दिवसीय कार्यशाळेत क्रिकेट खेळतील बदलेले नियम याबाबत मार्गदर्शन करण्यात आली व इतर नियमांची revision परस्परातील चर्चेद्वारे केली गेली. यानंतर सर्व पंचांची ५० गुणांची revision टेस्ट घेण्यात आली. शनिवार दिनांक १३ रोजी या कार्यशाळेचे उद्घाटन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे यांनी केले.
समारोप प्रसंगी जळगावचे पंच संदीप गांगुर्डे हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयोजित पंच परीक्षा उत्तीर्ण झाले व त्यांचा समावेश बीसीसीआयच्या पंच पॅनल मध्ये झाला याबद्दल त्यांचा गौरव व सत्कार करण्यात आला. त्यांच्या बरोबरच जळगाव चे दोन पंच वरुण देशपांडे व मुश्ताक अली यांचा महाराष्ट्र क्रिकेट पंच पॅनल मध्ये समावेश झाला याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. तसेच मागीलवर्षी जे पंच परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी अजय देशपांडे, सुयश बुरकुल, अरविंद देशपांडे, संदीप चव्हाण, मंगेश नार्वेकर व संदीप गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. नाशिकचे पंच व्हॅलेन्टाईन मार्कंडो हे यावर्षी निवृत्त होत आहेत म्हणून त्यांचाही गौरव शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला व त्यांच्या कामगीबद्दल संदीप चव्हाण यांनी माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य १६ वर्षाआतील मुलांच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकुल यांनी पंचांशी संवाद साधला व क्रिकेट नियमांची अंमलबजावणी करतांना खेळाडू व पंच यांच्यातील दरी कमी करण्याचे आवाहन उपस्थित पंचांना केले.
अजय देशपांडे यांनी या कार्यशाळेच्या उत्तम आयोजनाबद्दल जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीचे व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे विशेष कौतुक करून आभार मानले. संदीप गांगुर्डे यांनी आपल्या पंच प्रवासात जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा भक्कम पाठिंबा व सहकार्य मिळाले हे नमूद करताना प्रथम पंच परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर लगेचच जळगाव येथे आयोजित खान्देश सेंट्रल क्रिकेट स्पर्धेच्या तांत्रिक समितीची संपूर्ण जबाबदारी मला सोपविली होती ही बाब अधोरेखित केली.
जळगाव जिल्ह्यात क्रिकेट असोसिएशन चे सचिव व जळगाव जिल्ह्याचे प्रथम अधिकृत पंच यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पंचांनी नेहमीच तटस्थ राहून आपली कामगिरी बजावावी तसेच आपण वर केलेले बोट फलंदाजाचे भविष्य ठरवत असते याचा विचार करताना प्रथम क्षणी आपल्याला वाटलेल्या (बाद किंवा नाबाद) निर्णयावर ठाम रहावे असा मोलाचा सल्लाही त्यांनी उपस्थित पंचांना दिला.