जळगाव शहरात महाबळ रोडवरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील समता नगर येथे राहणाऱ्या तरुणाने पत्नी नांदायला येत नाही म्हणून तक्रार देण्यास पोलीस स्टेशनला आला होता. दरम्यान त्याच वेळी पत्नीचा फोन आला. फोनवर दोघांचे चांगलेच वाद झाले या वादानंतर पोलीस स्टेशन समोर तरुणाने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. उपचारादरम्यान ८ दिवसांनी या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
सुनील ममराज पवार (वय २५, रा. समता नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, पत्नी यांच्यासह राहत होता. एका हॉटेलमध्ये काम करून तो उदरनिर्वाह करीत होता. (केसीएन)दरम्यान, सुनीलची पत्नी काही दिवसांपासून माहेरी गेली होती. पत्नी पुन्हा घरी परत यावी यासाठी सुनील पवार हा दि. ६ सप्टेंबरच्या संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याच्या मामी सोबत रामानंद नगर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी सुनीलची मामी पोलिसांना घटनेची माहिती देत होती.
त्याच वेळेला सुनीलला त्याच्या पत्नीचा फोन आला. फोनवर त्याने तिला घरी येण्यासाठी विनवले. मात्र दोघांच्या संवादामधून विवाद वाढत गेला. सुनील पवार याने संतापाच्या भरात त्याच्या वाहनाच्या डिकीतून पेट्रोलची बाटली बाहेर काढली.(केसीएन)पेट्रोल अंगावर ओतून घेत त्याचे स्वतःला पेटवून घेतले. घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशन मधील कर्मचारी योगेश माळी यांनी त्यांचा शर्ट काढून त्याच्या अंगावरची आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तात्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
घटनेमध्ये सुनील वाघ हा ६० ते ६५ टक्के जळाल्यामुळे गंभीर झाला होता. अखेर उपचारादरम्यान रविवार दि. १४ रोजी रात्री ७ वाजता सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे सुनील पवार यांच्या परिवारासह समता नगर येथे शोककळा पसरली आहे. घटनाप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते. पोलीस स्टेशन समोरच पेटवून घेतल्यामुळे व त्यात तरुणाचा आता मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.