जामनेर येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीने दस्तऐवज तयार करून शासनाची सुमारे २१ लाखांहून अधिक रकमेची सहाय्यक महसूल अधिकारी हर्षल विश्वनाथ पाटील यांनी फसवणूक केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे उघडकीस आली. हर्षल पाटील यांचेवर निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव तहसीलदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या तक्रारीवरून संशयित सहाय्यक महसूल अधिकारी पाटील यांच्या विरोधात शनिवार १३ रोजी जामनेर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
हर्षल विश्वनाथ पाटील या सहाय्यक महसूल अधिकाऱ्याने स्वतःच्या लाभासाठी तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीने शासकीय दस्तऐवज तयार करणे, सदरचे दस्तऐवज आणि आदेश खरे असल्याचे भासविणे, बनावट आदेश शासकीय तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयात प्रकरणातील अर्जदार यांचेमार्फत देऊन शासनाचा सुमारे २१ लाख ६३ हजार २८५ रूपयांचा महसूल बुडविल्याचा आरोप हर्षल पाटील यांच्यावर आहे.
सदर प्रकरणातील शासकीय नजराणा रक्कम २१ लाख ६३ हजार रूपयांच्या बाबतीत आपल्याकडून शासकीय फसवणूक झाली आहे. आणि सदरची रक्कम शासनाकडे भरण्यास तयार असल्याची कबुली तहसीलदारांकडे यापूर्वीच भ्रमणध्वनीवर संदेश पाठवून दिली आहे. त्याच प्रमाणे माझ्या कुटुंबाचा व मुलांच्या भविष्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मला अक्षम्य चूक दुरूस्त करण्याची संधी देण्यात यावी, असेही हर्षल पाटील याने गुन्हा कबूल करत तहसीलदार नानासाहेब आगळे यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवरून पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे हे करीत आहे. शासनाचा सुमारे २१ लाखांचा महसूल बुडण्यास कारणीभूत ठरलेल्या सहाय्यक महसूल अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव तहसीलदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे.