जळगाव शहरात गेंदालाल मिल येथे शहर पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरात अवैध शस्त्रे बाळगून फिरणाऱ्या एका टोळीचा शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २ गावठी पिस्तूल, १० जिवंत काडतुसे, १ मॅगझिन आणि १ कार असा एकूण १ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दि. ११ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा करण्यात आली.
पोलीस कॉन्स्टेबल प्रणय सुरेश पवार आपल्या पथकासह रात्री गस्त घालत होते. त्यांना एका गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. गेंदालाल मिल परिसरात एका कारमध्ये काही संशयित व्यक्ती अवैध शस्त्रे घेऊन फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. याची गंभीर दखल घेत त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना माहिती दिली. त्यांच्या सूचनेनुसार, पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सापळा रचला. पोलिसांनी घटनास्थळी संशयास्पद कार थांबवून चौकशी केली. सुरुवातीला आरोपींनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी जवळ गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगल्याची कबुली दिली. या कारवाईत युनुस उर्फ सद्दाम सलीम पटेल (वय ३३), निजामोद्दीन शेख (वय ३१), शोएब अब्दुल सईद शेख (वय २९) आणि सौहिल शेख उर्फ दया सीआयडी (वय २९) या चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण २ पिस्तूल, १० जिवंत काडतुसे, एक मॅगझिन आणि एक कार असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे.