शनिपेठ पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेल्या एका गुन्हेगाराला शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे. गणेश उर्फ काल्या रविंद्र सोनवणे (वय २७, रा. कांचननगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मंगळवारी, ९ सप्टेंबर रोजी पहाटे ही कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना गणेश सोनवणे शहरात परतल्याची माहिती मिळाली होती. गणेश उर्फ काल्या सोनवणे हा कांचननगर परिसरातील एक कुख्यात गुन्हेगार असून त्याला दोन वर्षांसाठी त्याला शहरातून हद्दपार करण्यात आले होते. तरीही तो शहरात परतल्याची गुप्त माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली. त्यांनी तात्काळ ही माहिती गुन्हे शोध पथकाला दिली. त्यानुसार, रात्री गस्तीवर असलेल्या गुन्हे शोध पथकातील अंमलदार रविंद्र साबळे, महेंद्र पाटील, दीपक गजरे यांनी पहाटेच्या सुमारास कांचननगर परिसरात अचानक धाड टाकली. पोलीस पथकाने गणेश सोनवणे याच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तो हद्दपार असतानाही शहरात परतल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्र पोलीस अधिनियमअंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला पोलीस हवालदार भारती पाटील करत आहेत.