‘विश्वबंधुत्व दिना’निमित्त स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
जळगाव ( प्रतिनिधी ) – विश्वबंधुत्व दिनानिमित्त दीपस्तंभ फाउंडेशनच्या ‘मनोबल’ प्रकल्पात स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उत्साहात पार पडले. या निमित्ताने स्वामी विवेकानंदांचे जीवनविचार, त्यांची शिकवण आणि त्यांच्या संदेशांचे आजच्या युगातील महत्त्व अधोरेखित झाले.
समारंभाची सुरुवात मंगलप्रार्थनेने झाली. त्यानंतर विद्यार्थिनींनी सादर केलेल्या प्रेरणादायी ‘विवेकानंद गीताने’ उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्यास आमदार श्री. अतुल भातखळकर, सौ. रश्मी भातखळकर, जळगाव शहराचे आमदार श्री. राजुमामा भोळे, प्रा. जी. आर. महाजन आणि प्रख्यात हृदय भुलतज्ञ डॉ. अलका मांडके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रा. जी. आर. महाजन यांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रसिद्ध तीन मुद्रांचा सखोल अर्थ उलगडून सांगितला.तसेच 11 सप्टेंबर विश्वबंधुत्व दिनाची पार्श्वभूमी व उद्देश स्पष्ट केला.
आ. अतुल भातखळकर आमदार अतुल भातखळकर म्हणाले की,”स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे प्रत्यक्ष रूप दीपस्तंभ मनोबल या अद्वितीय प्रकल्पामध्ये बघायला मिळाले.
सर्वांना सामावून घेणारा हिंदू धर्म हा विश्वबंधुत्वाची शिकवण देतो सर्व धर्मांमधल्या चांगल्या गोष्टींचा स्वीकार करतो. जगाला सर्वप्रथम भारतीय तत्त्वज्ञानाची धर्माची आणि भारतीय लोकांच्या क्षमतांची ओळख स्वामी विवेकानंदांनी करुन करून दिली.
तसेच स्वामीजींनी आपल्या धर्मातील चुकीच्या परंपरांवर सुद्धा कठोर टीका करून परिवर्तनाची बीजे रोवली”.
दीपस्तंभ ‘मनोबल’चे संस्थापक श्री. यजूरवेंद्र महाजन यांनी सांगितले की, “स्वामी विवेकानंदांचे विचार हेच ‘दीपस्तंभ मनोबल’चे प्रेरणास्थान आहे. समता, करुणा , सेवा आणि धैर्य या मूल्यांचा आविष्कार प्रत्येक उपक्रमातून व्हावा, हाच आमचा प्रयत्न असतो.