पारोळा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांची कारवाई
पारोळा (प्रतिनिधी) :- येथील पोलिसांनी सापळा रचून अफूची तस्करी करणाऱ्या आरोपीला पकडून त्याच्याकडून १३ लाख १७ हजार ४७२ रुपयांचा १६४ किलो १३ गोण्या अफू, २० लाख रुपयांचा व १५ लाख रुपयांचा एक असे दोन ट्रक, २ लाख ५५ हजार ४७० रुपये रोख असा एकूण ५० लाख ८२ हजार ९४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शैतानाराम मानाराम बिष्णोई (वय ३४ रा. ढाणीया बालेसर जि जोधपूर, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे.पारोळा येथे राष्ट्रीय महामार्ग ५३ वर म्हसवे गावाजवळ रामदेव राजस्थानी ढाबा अफूची देवाण घेवाण होणार असल्याची माहिती निरीक्षक अशोक पवार यांना मिळाली होती. त्यांनी एपीआय योगेश महाजन, अमोल दुकळे, डॉ. शरद पाटील, सुनील हटकर, महेश पाटील, प्रवीण पाटील, संजय पाटील, संदीप सातपुते, निलेश साळुंखे मिथुन पाटील, भूषण पाटील, आशिष गायकवाड, तुशार सोनवणे, अजय बविस्कर, आकाश पाटील, अभिजित पाटील, देवेंद्र धरवडे, सुनील पाटील, गोपाळ पाटील यांच्या पथकाने ८ रोजी सापळा रचला होता. शरद पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.