अमळनेर तालुक्यातील लोण खुर्द येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील लोण खुर्द गावातील ३६ वर्षीय तरूणाने कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
समाधान विजय पाटील (वय ३६, रा. लोणखुर्द ता. अमळनेर) असे मयत तरूण शेतकऱ्याचे नाव आहे. शेती करून ते उदरनिर्वाह करत होते. मंगळवारी ९ सप्टेंबर रोजी सकाळी ते घरातून निघून गेले. समाधान पाटील हे घरी दिसत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी गावामध्ये त्यांचा शोध घेतला. मात्र ते कुठेच आढळले नाहीत. त्यानंतर, त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे दुपारी ३ वाजता समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार, समाधान पाटील यांच्यावर मोठे कर्ज होते आणि याच कारणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
काही ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना विहिरीतून बाहेर काढून तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी तपासणी केल्यानंतर मयत घोषीत केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल राजाराम पाटील हे करीत आहे.