डॉ. उल्हास पाटील आणि परिवाराचे सांत्वन ; आईंच्या स्मृतींना उजाळा
जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी परिवाराच्या प्रेरणास्थान स्व. गोदावरी आई पाटील यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अभिवादन केले. यावेळी डॉ. उल्हास पाटील यांच्यासह परिवाराचे त्यांनी सांत्वनही केले. याप्रसंगी गोदावरी आई पाटील यांच्या स्मृतींना त्यांनी उजाळा दिला.
राज्यभरात ज्यांच्या नावाने जळगावची ओळख निर्माण झाली अशा गोदावरी आई पाटील यांना दि. ३ रोजी देवाज्ञा झाली. या अनपेक्षित घटनेने गोदावरी परिवारावर दु:खाचा डोंगरच कोसळला. स्व. गोदावरी आई अनंतात विलीन झाल्या असल्या तरी त्यांच्या आठवणी मात्र कायम आहेत. स्व. गोदावरी आई अनंताच्या प्रवासाला मार्गस्थ झाल्यानंतर जिल्ह्यासह राज्यभरातून गोदावरी परिवाराविषयी सांत्वन व्यक्त केले जात आहे.
पालकमंत्र्यांसह जलसंपदा मंत्र्यांकडून सांत्वन
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या जळगाव येथील निवासस्थानी भेट देऊन स्व. गोदावरी आईंना अभिवादन केले. याप्रसंगी त्यांनी डॉ. उल्हास पाटील, सुभाष पाटील, प्रमिला भारंबे, डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. अक्षता पाटील यांचे सांत्वन करीत स्व. गोदावरी आईंच्या स्मृतीला उजाळा दिला. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी,जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, संजय गरूड, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी आमदार दिलीप वाघ, कुलगुरू डॉ. व्ही.एल. माहेश्वरी यांनी पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले. स्वामीनारायण मंदिराचे महंत यांनी देखिल स्व. गोदावरी आईंना अभिवादन केले. तसेच शहरातील प्रतिष्ठीत डॉक्टर्स, सामाजिक प्रतिनीधी यांच्याकडूनही पाटील परिवाराचे सांत्वन करण्यात आले.