यावल तालुक्यातील मनुदेवी परिसरातील घटना
यावल (प्रतिनिधी)- तालुक्यातील मनुदेवी परिसरात पांझर तलाव येथे मित्रांसोबत गणेश विसर्जनासाठी गेलेले असताना एका इसमाचा नाचताना अचानक तोल गेल्याने तलावात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि. ६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रोहिदास शिवाराम लहांगे (कोकणी,वय ४२, रा. खालकोट ता. यावल) असे मयत इसमाचे नाव आहे शनिवारी दि. ६ सप्टेंबर रोजी सर्वत्र अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जनाकरिता लगबग नागरिकांची सुरू होती. या वेळेला रोहिदास लहांगे हे गावातील काही तरुणांसोबत गणेश विसर्जनाकरिता मनुदेवी शिवारातील पाझर तलावाकडे गेले होते.
त्या ठिकाणी नाचता नाचता त्यांचा पाय घसरून ते तलावात पडले. त्यांचा नागरिकांनी शोध घेतला असता ते दुसऱ्या दिवशी रविवारी दि. ७ सप्टेंबर रोजी १ वाजेच्या सुमारास मिळून आले.त्यांचा मृतदेह यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेप्रकरणी खालकोट गावात शोककळा पसरली आहे. नातेवाईकांनी यावेळी आक्रोश केला. यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी तपास करीत आहेत.