जळगाव शहरातील गिरणा पम्पिंग परिसरात घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरात वाघ नगर येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय तरुणाचा गणपती विसर्जनादरम्यान गिरणा नदीत बुडून वाहून गेल्याची घटना समोर आली. हा तरुण मित्रासोबत गणपती विसर्जनासाठी गेला होता, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडून वाहून गेला. अद्याप त्याचा मृतदेह सापडलेला नाही. जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी स्थानिकांच्या मदतीने शोध घेत आहेत.
राहुल रतिलाल सोनार (वय ३४, रा. वाघ नगर, जळगाव) असे या मयत तरुणाचे नाव आहे. तो आई-वडील आणि मोठ्या भावासह वाघ नगर येथे राहत होता. राहुल हा कोल्हे हिल्स येथील एका हॉटेलमध्ये नोकरी करत होता. शनिवारी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तो मित्र विश्वनाथ पाटील याच्यासोबत आर्यन पार्क येथील गिरणा नदीपात्रात गणपती विसर्जन करण्यासाठी गेला होता. दोघेही गणपती बुडवण्यासाठी पाण्यात उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडू लागले. त्यावेळी एकाने विश्वनाथ पाटील याला पाण्यातून बाहेर काढले, पण दुर्दैवाने राहुल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस प्रशासनाने तरुणाचा शोध सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे राहुलच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.