लेखिका : डॉ. रिया संजय अग्रवाल
सहायक प्राध्यापक, डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी कॉलेज
आज जगभरात लोकांचे आयुर्मान वाढत आहे आणि त्यामुळे वृद्धत्व या टप्प्यावर अधिक लक्ष दिले जात आहे. वर्ल्ड फिजिओथेरपी डे २०२५ या वर्षी निरोगी वृद्धत्व (कशरश्रींहू -सशळपस) हा महत्त्वाचा विषय घेऊन येतो आहे. वृद्ध होणे टाळता येत नाही, पण ते निरोगी, सक्रिय आणि आत्मनिर्भर राहता येईल, याची जाणीव करून देणारा हा दिवस आहे. यामध्ये फिजिओथेरपीचा फार मोठा वाटा आहे.
वृद्धापकाळात शरीरात अनेक नैसर्गिक बदल होतात-हाडं कमकुवत होणे, स्नायूंची ताकद कमी होणे, सांधेदुखी, हालचालींमध्ये अडथळा निर्माण होणे, आणि मधुमेह, हृदयविकार, संधिवात यांसारख्या दीर्घकालीन आजारांचा सामना करावा लागतो. हे सर्व आरोग्यविषयक प्रश्न केवळ हालचालींवरच परिणाम करत नाहीत, तर आत्मविश्वास, मानसिक आरोग्य आणि एकूण जीवनमानावरही प्रभाव टाकतात. पण हे सर्व अटळ नाही. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने फिजिओथेरपीच्या सहाय्याने यावर मात करता येते.
फिजिओथेरपी म्हणजे केवळ दुखापतीनंतर पुनर्वसन नव्हे, तर नियमित हालचालींचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन. यात व्यक्तीच्या गरजा ओळखून त्यानुसार व्यायाम, संतुलन सुधारण्यासाठी तंत्र, सांधेदुखी कमी करणार्या हालचाली, आणि दैनंदिन जीवनात स्वावलंबी राहण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. यामुळे वृद्ध व्यक्तींना चालणे, बसणे, उठणे, जिना चढणे अशा रोजच्या हालचाली अधिक सुरक्षितपणे करता येतात. याचा थेट परिणाम म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि अवलंबित्व कमी होते.
वृद्धत्वाकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. वय वाढलं म्हणजे त्रास अपरिहार्य असा समज फारच सामान्य आहे. पण सतत हालचाल, योग्य मार्गदर्शन, आणि नियमित फिजिओथेरपी यामुळे अशा अनेक समस्या टाळता किंवा लांबवता येतात. संशोधनदेखील हेच सांगते की, वयस्कर लोकांसाठी नियमित व्यायाम हा औषधाइतकाच प्रभावी उपाय आहे. त्यामुळे केवळ आरोग्य राखण्यापुरताच नव्हे, तर आयुष्याचा दर्जा वाढवण्यासाठी फिजिओथेरपी महत्त्वाची आहे.
फक्त शारीरिक आरोग्य नव्हे, तर मानसिक आणि सामाजिक आरोग्य जपण्यासाठीही फिजिओथेरपी उपयुक्त ठरते. वृद्ध व्यक्तींमध्ये हालचाल कमी झाल्यामुळे अनेकदा एकटेपणा, चिंता, किंवा नैराश्य वाढते. पण जर शरीर सक्रिय असेल, तर मनही सकारात्मक राहते. यासाठी फिजिओथेरपी एक मार्गदर्शक ठरते-ती व्यक्तीला पुन्हा त्यांच्या दिनक्रमात सहभागी होण्यासाठी आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी सक्षम करते.
कुटुंबातील सदस्यांनी आणि काळजीवाहूंनी यामध्ये सक्रिय भूमिका बजावणे आवश्यक आहे. वृद्ध व्यक्तींना चालण्यासाठी, घरात सुरक्षित वातावरण ठेवण्यासाठी, आणि फिजिओथेरपीच्या सल्ल्याचे पालन करण्यासाठी प्रेरित करणे, हे सगळे निरोगी वृद्धत्वासाठी फारच आवश्यक आहे. थोडक्यात, वय वाढत असले तरी जीवनात गती टिकवून ठेवणे शक्य आहे.
आजच्या घडीला जग वृद्ध होत चालले आहे आणि अशा वेळी आरोग्यसेवेच्या प्रत्येक टप्प्यावर फिजिओथेरपीचा समावेश करणे ही काळाची गरज आहे. फिजिओथेरपी खर्चिक नाही, परंतु प्रभावी आहे. ती वैद्यकीयच नव्हे, तर सामाजिक व मानसिक पातळीवरही सकारात्मक परिणाम करणारी सेवा आहे. त्यामुळे, वर्ल्ड फिजिओथेरपी डे २०२५ आपल्याला हे सांगतो की, वृद्धत्व हे टाळता येत नाही, पण ते कसे घडवायचे हे आपल्या हातात आहे.
वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आपण स्वतःकडे लक्ष दिल्यास, योग्य व्यायाम आणि फिजिओथेरपीचा आधार घेतल्यास, वृद्धत्व हे एक आशादायक आणि सशक्त प्रवास ठरू शकतो. कारण वय वाढतं, पण उत्साह मात्र कमी होऊ नये.