जामनेर तालुक्यातील नेरी येथील घटना
जामनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील नेरी येथे भरधाव डंपरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या अपघातात गजानन अरुण पाटील (वय ३०, रा. नेरी दिगर) जागीच ठार झाले. जामनेर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
डंपर क्रमांक एमएच २८- ९१८५चा चालक आकाश भरत राजपूत याने नेरी येथील शिवाजी पुतळ्याजवळ गजानन पाटील यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून त्याला वावडदा येथून पकडले. डंपर ताब्यात घेण्यात आला असून तो अपघाताच्या वेळी रिकामा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, अपघातानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी प्रशासनावरही तीव्र संताप व्यक्त केला. डंपरमार्फत सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीकडे प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.