विद्यार्थ्यांनी अनुभवले अध्यापनाचे कार्य
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांबरुड राणीचे येथे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांनीच शिक्षकांच्या भूमिकेत शिरून शाळा चालवण्याचा अनोखा अनुभव घेतला.
सर्वप्रथम, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापकाची भूमिका साकारणाऱ्या मनीष थोरात आणि उपमुख्याध्यापकाच्या भूमिकेत असलेल्या अरमान मेवाती यांनी केले. यावेळी, शिक्षक बनलेले विद्यार्थी, सर्व शिक्षक, आणि इतर विद्यार्थी उपस्थित होते. या वर्षी तब्बल २२ विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून शाळेची जबाबदारी सांभाळली. परिपाठापासून ते वर्ग शिकवण्यापर्यंत आणि शेवटी आपले अनुभव सांगण्यापर्यंत सर्व गोष्टींचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.
मुख्याध्यापकाच्या भूमिकेत मनीष थोरात, उपमुख्याध्यापकाच्या भूमिकेत अरमान मेवाती, तर समर्थ पाटील, चेतन पाटील, कुणाल इंगळे, आर्यन पाटील, हर्षल आढाव, रुपेश पाटील, जयेश शिंदे, सुरज काटे, भावेश सोनवणे, तोहीन मेवाती, हर्षदा भदाणे, उन्नती दरकोंडे, योगिनी पाटील, परिणीता वाघ, गुंजन सूर्यवंशी, साक्षी आढाव, मयुरी पाटील, वर्षा वाघ, लावण्या बडगुजर, आणि हर्षाली कुंभार या विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका पार पाडली. त्यांनी पहिली ते चौथीच्या एकूण ११ वर्गांचे काम यशस्वीपणे सांभाळले.
या अनुभवाविषयी बोलताना, हर्षदा भदाणे म्हणाली की, “विद्यार्थ्यांना शांत ठेवणे खूप कठीण काम आहे. मुले खूप गोंधळ करतात. सर, तुम्ही आम्हाला कसे शिकवता हे आज समजले. आम्ही तुम्हाला शिकवताना खूप त्रास देतो.” तिने सर्वांचे आभार मानले. इतर विद्यार्थ्यांनीही हा अनुभव खूप खास असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक भाऊसाहेब पवार, शिक्षक सुभाष जगताप, प्रशांत गवळी, सचिन सोनवणे, प्रवीण सोनकुळ, अनिल बेलदार, किशोर महाजन, भटूकांत चौधरी, राकेश धायबर, महेश गवादे, गायत्री जैन, आणि रुपाली चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.









