यावल तालुक्यात साकळी गावाजवळ घटना
यावल (प्रतिनिधी) :- यावल-चोपडा राज्य महामार्गावरील साकळी गावाजवळ सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. दुचाकी आणि चारचाकी क्रूझर यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहित रविंद्र कुवर (वय २५, रा. धनगरवाडा, यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे. कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. विशेष म्हणजे अवघ्या चार महिन्यांपूर्वीच त्याचे विवाह झाले होते. तो दुचाकी (क्र. एमएच १९ एक्स १७४४) वरून यावलच्या दिशेने जात होता. दरम्यान, सोमवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास साकळी गावाजवळील भारत टोलकाटक्यानजीक सुनिल प्रविण पाटील (रा. किनगाव, ता. यावल) यांच्या ताब्यातील क्रूझर वाहन (क्र.एमएच १९ बियु २१२९) व मोहितच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली.
धडक इतकी भीषण होती की मोहित कुवर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मोहीतला रुग्णालयात दाखल केले असता त्याला तपासून मयत घोषित करण्यात आले. यावल पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार वाहनांच्या वेगाचा अंदाज व चुकीच्या बाजूने चालविल्याचा संशय व्यक्त होत आहे.