अमळनेर तालुक्यातील खेडी व्यवहारदळे येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- गुरे चारण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खेडी व्यवहारदळे येथे दिनांक १ रोजी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आनंद सोनू मालचे (वय ५६) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते १ रोजी सकाळी ९ वाजता गावातील शेतकऱ्याची म्हशी चरायला घेऊन गेले होते. त्यानंतर त्यांच्या चपला व पिशवी काठावर आढळून आल्या, मात्र ते दिसून न आल्याने इतरांना शंका आल्याने त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना व पोहणाऱ्यांना बोलवून तलावात शोध घेतला असता त्यांचा मृतदेह तलावात आढळून आला.
म्हशी तलावात पाणी पिण्यासाठी गेल्या होता, त्यांना काढण्यासाठी ते उतरले असता त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय रामकृष्ण कुमावत हे करीत आहेत.