जळगांव ;- जिल्हयामध्ये कोव्हिड-19 विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून कोव्हिड-19 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या देखील मोठया प्रमाणात वाढलेली आहे. या पार्श्वभुमीवर क्षेत्रीय स्तरावरुन माहिती घेतली असता, अशी बाब निदर्शनास आली आहे की जळगांव जिल्हयामध्ये कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी मोठया प्रमाणात लोक गर्दी करीत आहेत. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल अशा सूचना शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. या पार्श्वभुमीवर अंत्यविधीसाठी 20 पेक्षा अधिक लोकांनी उपस्थित राहू नये व मृतदेह हाताळतांना देखील शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. जेणे करुन कोव्हिड-19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यास हातभार लागेल, असे आवाहन डॉ अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी जळगांव यांनी केलेले आहे.







