एमआयडीसी परिसरातील बालाजी इंडस्ट्रीजवळ घडली घटना
जळगाव : ‘तू भाई झाला का? पोलीस स्टेशनला का आला होतास?’ असे विचारून दोघांनी एका तरुणाला रस्त्यात अडवून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. ही घटना १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी परिसरातील बालाजी इंडस्ट्रीजवळ घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील रायपूर येथील राजकिरण मानसिंग परदेशी (वय २६) हे १ सप्टेंबर रोजी सायंकाळी कामावर जात असताना, एमआयडीसीतील बालाजी इंडस्ट्रीजवळ त्यांना दोन जणांनी अडवले. त्यावेळी एका व्यक्तीने त्यांना ‘तू भाई झाला का? पोलीस स्टेशनला का आला होतास? गाडीतून खाली उतर,’ असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यानंतर त्या दोघांनी मिळून राजकिरण यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी एकाने आपल्याजवळील धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत राजकिरण यांनी उपचार घेतल्यानंतर एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल केली.
या तक्रारीनुसार, कृष्णा शिंदे आणि मयूर नामक तरुणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संजीव मोरे करत आहेत.