जळगाव : उसनवारीच्या पैशांवरून वाद झाल्याने चौघांनी मिळून दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना ३१ ऑगस्ट रोजी शहरात घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामेश्वर कॉलनी येथे राहणारा गजानन राजाराम रायते (वय २६) याचे काही लोकांसोबत उसनवारीच्या पैशांवरून वाद सुरू होते. याच वादातून ३१ ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊ वाजता शुभम पाटील याने गजाननला काशिनाथ चौकात बोलावले. गजानन त्याचा मित्र शेखर तरटे याच्यासह तिथे पोहोचला. यावेळी शुभमने त्याचे साथीदार सनी जाधव, दिनेश चौधरी, आणि अप्प्या उर्फ आकाश मराठे यांनाही तिथे बोलावले होते.
गजाननचा मित्र शेखर बोलत असताना सनी जाधवने त्याला तोंडावर थप्पड मारून शिवीगाळ केली आणि ‘तू मध्ये बोलू नकोस’ असे बजावले. त्यानंतर त्यांनी दोघांनाही मेहरुण परिसरातील अशोक किराणाजवळ बोलावले.
हे दोन्ही तरुण त्या ठिकाणी गेल्यावर चौघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत शुभम पाटीलने शेखर तरटेला लाकडी दांडक्याने मारून गंभीर जखमी केले. तसेच, शिवीगाळ करत ‘आपली खुन्नस कायम राहील’ अशी धमकीही दिली.
या प्रकरणी गजानन रायतेने दिलेल्या तक्रारीनुसार, शुभम विजय पाटील, सनी जाधव, दिनेश चौधरी आणि अप्प्या उर्फ आकाश मराठे (सर्व रा. रामेश्वर कॉलनी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार किरण चौधरी करत आहेत.