जळगावात आई, पती, बहीण, प्रियकरासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ) – मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानादेखील आईसह चुलत बहीण व मेहुण्याने तिचे लग्न लावून दिले. लग्नानंतर पतीने मारहाण केल्याने बहिणीकडे निघून आलेली ही मुलगी नंतर प्रियकरासोबत गेली. त्यादरम्यान त्यांच्यात शरीर संबंध आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वरील तिघे तसेच पती, त्याच्या नातेवाइकांसह मुलीचा प्रियकर व मदत करणारे, अशा एकूण १० जणांविरुद्ध शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर तालुक्यातील एका गावातील महिला तिच्या १५ वर्षीय मुलीला जून महिन्यात जळगावात पुतणीकडे घेऊन आली. येथे या मुलीचे चांगदेव येथील तरुणाशी जबरदस्तीने लग्न लावून दिले. त्यानंतर पतीने तिला मारहाण केल्याने ती जळगावात चुलत बहिणीकडे निघून आली. त्यानंतर बहिणीच्या दिराने या अल्पवयीन मुलीला घराबाहेर काढले. तिने प्रियकराशी संपर्क साधून त्याला जळगावात बोलविले. तो या मुलीला कुसुंबा, ता. जळगाव येथे एका महिलेकडे घेऊन गेला. तेथे राहत असताना मुलगी व तिच्या प्रियकरामध्ये शारीरिक संबंध आले.
हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आला. त्यामुळे मुलीसह आई निंभोरा पोलिस ठाण्यात पोहोचली. तेथे मुलीने फिर्याद दिली. त्यावरून मुलीची आई, चुलत बहीण, चुलत मेहुणा, त्याचा भाऊ, मुलीचा पती, माम सासरे, माम सासू, प्रियकर, त्याला राहण्यासाठी मदत करणारी महिला, अशा एकूण १० जणांविरुद्ध ३१ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा शनिपेठ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि साजिद मन्सुरी करीत आहेत.