अमळनेर तालुक्यात मारवड, भरवस मंडळातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मारवड व भरवस मंडळात शुक्रवारी दि. २९ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ढगफुटीसदृष्य पाऊस झाला. नाल्यांना पाणी येऊन रस्ते बंद झाल्याने कळसमरे, नीम, वासरे, डांगरी गावाचा संपर्क तुटला होता. वादळी वाऱ्यांसह पावसाने जोरदार वर्षाव केल्याने मारवड मंडळ, भरवस मंडळात अतिवृष्टी झाली.
कळमसरे, नीम, वासरे, खेडी, मारवड, डांगी, बोहरा परिसरातील फरशी पुलावरुन पाणी वाहत असल्याने संपर्क तुटला होता. तर वासरे, गावाला पाण्याचा वेढा पडल्याने गावात प्रत्येक गल्लीत पाणी वाहताना दिसून आले. भरवस येथील रेल्वे बोगद्यातुन पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पाडसे, खदें, चौबारी गावात पाण्यामुळे नुकसान झाले आहे. वादळ वारा असल्यामुळे वीज प्रवाह बंद झाला होता. मारवड, भरवस मंडळातील बऱ्याच गावातील पिकांचे या पावसाने मोठे नुकसान झाल्याचेही चित्र आहे. मात्र जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यात प्रथमच जोरदार पाऊस झाल्याने नदी नाले जोरदार वाहू लागले आहेत. नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.