रावेर तालुक्यातील वाघोद्याजवळ अपघात
रावेर ( प्रतिनिधी ) – अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील मोठा वाघोदा बु गावाच्या पुढे सुकी नदीजवळील वळणावर बुधवारी एक भीषण अपघात घडला. पिकअप मालवाहू वाहनाने (एमएच ०४ केयू ८२५७) ने समोरून येणाऱ्या दुचाकीला (एमएच १९ – ईडी ३९५६) जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
विकास शशिकांत धांडे (वय २८, रा. रोझोदा, ता. रावेर, जि. जळगाव) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.वाहनचालकाने रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवले, ज्यामुळे ही दुर्घटना घडली, असे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. विकास धांडे हे पेट्रोल पंपाजवळील वळणावरून जात असताना पिकअपने समोरून येऊन जोरात धडक दिली. ही दुर्घटना बुधवारी सायंकाळी घडली.
या प्रकरणी भूषण शशिकांत धांडे (वय ३०, रा. जितेंद्र नगर रोड, रोझोदा) यांच्या तक्रारीवरून पंकज गोकुळ धनगर (रा. चहार्डी, ता. चोपडा) याच्याविरुद्ध सावदा पोलिस स्टेशन येथे रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.हे.कॉ. विनोद तडवी हे साहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.