जळगाव तालुक्यात पाळधी ते तरसोद दरम्यान घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरापासून जवळ असलेल्या पाळधी ते तरसोद दरम्यानच्या नवीन राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास दोन मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली होती. या भीषण अपघातात दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाले होते. घटनेत एक चालक हा गुजरात राज्यातील तर दुसरा आंध्र प्रदेश राज्यातील असल्याचे दिसून आले आहे.
अपघातात दोन्ही ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. मृत चालकांचे मृतदेह ट्रकच्या केबिनमध्ये अडकल्याने त्याला बाहेर काढणे अवघड झाले. जेसीबी आणि क्रेनच्या मदतीने ट्रकचा भाग बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आला. (केसीएन)अपघाताच्या वेळी (जीजे १६ एवाय ००७८) क्रमांकाच्या ट्रकमध्ये दगडी कोळसा भरलेला होता, तर (एपी ३९ यूएफ ३५९९) क्रमांकाच्या दुसऱ्या ट्रकमध्ये बांधकामासाठी लागणाऱ्या टाइल्स होत्या. दोन्ही ट्रक कचरा फॅक्टरीजवळ एकमेकांवर आदळले. या जोरदार धडकेमुळे दगडी कोळशाने भरलेला ट्रक उलटला आणि दुसऱ्या ट्रकमधील टाइल्सचा ढिगही रस्त्यावर पसरला होता.
घटनेतील एका ट्रकमधील चालक हा अशोककुमार जगानी महतो (वय ५०, रा. नानि दमन, गुजरात, मूळ बोरम,पुरुलिया जि.ठाकूरसीमा, प. बंगाल) असल्याची ओळख नातेवाईकांनी पटवली. अशोककुमार यांना आई, वडील, पत्नी, २ मुले असा परिवार आहे.(केसीएन)तर अशोककुमार हे पूर्वी राकेश रोडलाईन्स येथे काम करायचे, आता काहीच दिवसांपूर्वी नव्याने त्यांनी चम्बल रोडलाईन्समध्ये काम सुरु केले होते. तर दुसऱ्या ट्रकमधील शेख मालानी मदरसाहेब (वय ४५, रा. आंधीचेरे येरुबाबु, जि. खमण, आंध्र प्रदेश) असल्याची ओळख पटली आहे. दोघांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात येऊन शोक व्यक्त केला.