जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगावचा युवा खेळाडू आणि कलावंत किशोर सूर्यवंशी याने सध्या जर्मनीत सुरु असलेल्या वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याने या क्रीडा स्पर्धेत ५ किलोमीटरच्या रेस वॉकमध्ये रजत पदक मिळवत भारताचे नाव उंचावले आहे.
५ किलोमीटर ची ही रेस वॉक किशोर ने ३८.४५ सेकंदात पूर्ण केली. त्याच्या या कामगिरीमुळे निश्चितच आपल्या जळगावसह भारताचे नाव उंचावले आहे. सततच्या डोकेदुखीमुळे दीर्घकाळ पेन किलर औषधी घेतल्याने १८ वर्षांपूर्वी किशोरच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. परिस्थिती अशी की चार पाऊले चालतांना देखील त्याला दम लागायचा. पण बहिण छायाने आपली एक किडनी देवून त्याला नवीन जीवनदान दिले आणि त्याने जणू या बोनस लाईफचे सोनेच केले.
ऑलिम्पिकच्याच धर्तीवर परंतु जगभरात अवयव दानाचा संदेश देण्यासाठी आयोजित होणाऱ्या ‘वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स’ मध्ये जगभरातील विविध देशातील अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तींचा समावेश असतो. दर दोन वर्षांनी विविध देशात होणाऱ्या या क्रीडास्पर्धांमध्ये साधारणतः ३००० पेक्षा अधिक खेळाडू विविध खेळांमध्ये आपापल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. बैडमिंटन, बास्केट बॉल, ॲथलेटिक्स गेम्स, गोळा फेक, स्विमिंग, फुटबॉल, रोड रेस, सायकलिंग, रिले रन यासारख्या अनेक खेळांचा या क्रीडास्पर्धेत समावेश असतो. यंदा जर्मनी येथे सुरु असलेल्या या क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय संघात एकूण ६० खेळाडू विविध खेळात पदक जिंकत भारताचे नाव उंचावत आहेत. सन २०१९ मध्ये इंग्लंड आणि सन २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या या क्रीडा स्पर्धामध्ये देखील किशोर ने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.