२ किमी पायपिट करून विद्यार्थ्याने गाठले घर, चोपडा तालुक्यातील घटना
चोपडा (प्रतिनिधी) :- एसटी महामंडळाच्या बसची पासची मुदत संपली म्हणून इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांला बस वाहकाने भर पावसात खाली उतरवले. हा विद्यार्थी २ किमी पायपीट करीत घरी परतला. या वाहकावर कारवाई प्रस्तावित केली आहे.
बादल राजाराम बारेला (वय ११, रा. उनपदेव ता. चोपडा) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. उनपदेवनजीक असलेल्या पाड्यावर तो राहतो. तिथून रोज ६ किमी अंतरावर असलेल्या अडावद येथील शाळेत जात असतो. त्याच्याकडील मासिक पास रविवार १७ ऑगस्ट रोजी संपली होती. त्याने पासचे नूतनीकरण केले नव्हते. बसवाहकाने त्याला तिकिटाविषयी विचारले असता पास संपल्याचे त्याने सांगितले. यावर वाहकाने त्याला अपशब्द वापरत भरपावसात गाडीतून खाली उतरवले. त्यामुळे पावसात भिजत हा विद्यार्थी दोन ते तीन किमी पायी चालून पाड्यावर आपल्या घरी परतला.
या घटनेविषयी कर्जाणे येथील उपसरपंच प्रमोद बारेला आणि बिरसा ब्रिगेड सातपुडाचे अध्यक्ष रामदास पावरा यांनी चोपडा येथील आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. शाळकरी मुलाला भरपावसात बेजबाबदारपणे रस्त्यात उतरवून देणे हा अमानुषपणा आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.