शनिपेठ पोलिसांची कामगिरी, मुद्देमाल जप्त
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील शनिपेठ पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून आरोपीला अटक केली आहे. चोरीस गेलेली बजाज पल्सर मोटारसायकल भुसावळ येथून जप्त करण्यात आली आहे.
शनिपेठ पोलीस स्टेशन येथे मोटारसायकल चोरीचा गुन्हा दि. १४ ऑगस्ट रोजी नोंदवण्यात आला होता. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने त्यांची बजाज पल्सर ही दुचाकी चोरून नेली होती. गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रदीप नन्नवरे यांच्या नेतृत्वात सुरू होता. गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ शशिकांत पाटील, पो. अं. निलेश घुगे, रविंद्र तायडे, पराग दुसाने, अमोल वंजारी व गणेश ढाकणे या कर्मचाऱ्यांनी तपास अधिक वेगाने राबवला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, संशयित आरोपी भुसावळ शहरातील पापानगर, ईराणी मोहल्ला येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार तपास पथकने स्थानिक पोलिसांची मदत घेतली. बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रवी नेरकर, पो. अं. प्रशांत सोनार, सचिन चौधरी यांच्या मदतीने संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. हसन अली उर्फ हशू नियाज अली (वय २३, रा. पापानगर, भुसावळ) असे त्याचे नाव आहे. आरोपीकडून चोरीस गेलेली बजाज पल्सर मोटारसायकल हस्तगत करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.