जामनेर शहरातील घटना
जामनेर (प्रतिनिधी) – शहरात पोलीस स्टेशनमधील एका कॉन्स्टेबलने गुंड पाठवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार शिक्षक कुटुंबाने जामनेर पोलिस ठाण्यात दिली आहे. १५ तास ठाण मांडून बसल्यानंतर त्या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर आणि पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे.
येथील जळगाव रोडवरील ओमशांती नगरमध्ये लताबाई ठाकरे या सहकुटुंब राहतात. त्यांचा मुलगा गोविंद ठाकरे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत.(केसीएन)त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्याच मागील कॉलनीत जामनेर पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागाचे पोलिस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांचे घर आहे. पाटील दररोज रात्री आमच्या घरासमोर १०० मीटर अंतरात फेऱ्या मातात व महिलांकडे अश्लील नजरेने पाहतात. याच कारणावरून महिन्याभरापूर्वीही आमच्यात वाद झाले होते. त्यावेळी जामनेर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक मधुकर कासार यांच्या मध्यस्थीने वाद मिटवले आहेत. मात्र त्यानंतरही पाटील हे आमच्याच गल्लीत फिरतात.
याबाबत त्यांना विचारणा केली असता कॉन्स्टेबल पाटील यांनी अश्लील शिवीगाळ करून गावगुंड बोलवून मुलगा गोविंद ठाकरे यास जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत लताबाई ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंद्रकांत पाटील यांचे विरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी रात्री साडेदहाला चंद्रकांत पाटील व ठाकरे कुटुंबीयांमध्ये वाद झाले. यानंतर गोविंद ठाकरे हे वृद्ध आई लताबाईसह पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेले.(केसीएन)पोलिसांनी जबाब लिहून घेतला. मात्र रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यामुळे त्यांनी १५ तास पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. चंद्रकांत पाटील पोलिस असल्याने तक्रार दाखल करून घेतली जात नाही, अशी तक्रार ठाकरे यांचे पोलिस उपनिरीक्षक असलेले बंधू वसंत ठाकरे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर व जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे केली. १५ तासांनी पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.