जळगाव (प्रतिनिधी) – ‘निसर्गकन्या’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहिणाबाईंच्या ओव्या आजही जनमानसात जीवंत आहेत. त्यांच्या काव्य साहित्यातून श्रमजीवी जीवन, निसर्गाचे सौंदर्य, स्त्रियांचे भावविश्व आणि ग्रामीण संस्कृती यांचे प्रतिबिंब ‘हिरिताचं देनं घेनं’ या श्रावण काव्यसंध्येत उमटले.
बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट व भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या १४५व्या जयंतीनिमित्त ‘हिरिताचं देनं घेनं’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ही श्रावण काव्यसंध्या भाऊंचे उद्यान येथे संपन्न झाली.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवी किरण डोंगरदिवे (बुलढाणा), कवयित्री रेणुका खटी पुरोहित (पुणे), माया धुप्पड, विमल वाणी, विश्वस्त दिनानाथ चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहिणाईंच्या पणतसून स्मिता चौधरी उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले.
जयश्री मिस्त्री हिने स्वरचित ‘कवयित्री माझी माय..’ व ‘अरे संसार संसार..’ कविता गाऊन कार्यक्रमाचा शुभारंभ केला.
किरण डोंगरदिवे यांनी ‘श्रावण मासी हर्ष..’ या कवितेवर भाष्य केले. निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी ना.धों.महानोर, बहिणाबाई चौधरी, बालकवी वाचावे असे सुचवले. पत्रकार आणि साहित्यिकांनी मिळुन समाज बदलविता येतो. स्वरचित ‘शाळेच्या वाटेवर बोरं विकत होती म्हातारी.. झाडांच्या पानो पानी..’ ही कविता म्हटली.
माया धुप्पड यांनी बहिणाबाईंनी संसार करतात निसर्गाची लिपी वाचली. ‘परशुराम बेलदारा..’ व ‘श्रावण उत्सव..’ या कविता म्हटली. सुखी ठेव देवराया.. असे म्हणत विटेचे कौतुक करताना साहित्यातून मनाची जडणघडण बहिणाबाई च्या कवितेतून होते. मनाची पोषण मुल्यांसह माणूस घडवायचे असेल तर साहित्याचा पाया मजबूत असावा. संत, साहित्य, ग्रंथाच्या आधारावरच सामाजिक व्यवस्था ठिकुन आहे. साहित्य वाचनासाठी नाही तर ते आचरणात आणण्यासाठी आहे.
रेणुका खटी पुरोहित यांनी कविता शिकण्याची नसते तर ती अनुभवण्याची असते. लढण्याचा आत्मविश्वास कविता देते. स्वरचित ‘श्रोता..’ ही कविता सादर करते. प्रत्येक प्रश्नाला, कठिण प्रसंगाला उत्तर देणारी ‘श्वासाची धडपड..’ ही रचना सादर केले. ‘अवघड होते आयुष्याचे गणित केवढे..’, सत्य आजवर दडले का.. रंग असा का उडलेला.. ही गजल म्हटली.
यानंतर विमल वाणी यांनी ‘आज दिवस पहा सोनियाचा..’, म्हण माहेर खान्देश.. ही रचना सादर करुन रसिकांची वाह वाह मिळविली. दादासाहेब वाघ, शितल पाटील, अरविंद महाजन, वंदना महाजन, संगिता महाजन, पुष्पा साळवे, प्रकाश पाटील यांनी आपल्या कविता सादर केल्या.
श्रावण काव्य संध्येत सहभागी झालेल्या कवी कवयित्री यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सहभागी मान्यवरांचे स्वागत तुळसीचे रोप व ग्रंथसंपदा देऊन अशोक चौधरी यांनी केले. ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालनासह सहभागी कवी-कवयित्रींचा परिचय करून दिला. किशोर कुळकर्णी यांनी आभार मानले.