जामनेर तालुक्यातील गोंडखेल येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- जामनेर तालुक्यातील गोंडखेल येथे पहाटेच्या वेळी अंगण आवरत असताना महिलेला विषारी सापाने दंश केल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता घडली आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
जयश्री शरद मगर (वय ३८, रा. गोंडखेल ता. जामनेर) असे मयत विवाहित महिलेचे नाव आहे. त्या गोंडखेल गावांमध्ये पती, दोन मुले यांच्यासह राहत होत्या. त्यांचे पती शरद मगर हे शेतमजूर म्हणून काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करत आहेत.(केसीएन)दरम्यान, मंगळवार दि. १९ ऑगस्ट रोजी पहाटे जयश्री मगर या सकाळी अंगण आवरत होत्या. त्यावेळेला अंगणात पडलेली कोपऱ्यातील रिकामी थैली उचलत असताना त्यांना कोब्रा या विषारी सापाने उजव्या हाताला दंश केला.
सुरुवातीला त्यांना काही समजले नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी जामनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथून प्रथमोपचार झाल्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मंगळवारी सकाळी १० वाजता जयश्री यांना अतीदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.(केसीएन)या ठिकाणी त्यांच्यावर उपचार चालू असताना ४ दिवसांनी शनिवारी दि. २३ रोजी सकाळी ८ वाजता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या वेळेला कुटुंबीयांनी रुग्णालयात आक्रोश केला. घटनेमुळे गोंडखेल गावामध्ये शोककळा पसरली आहे. घटनेची संबंधित पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.