एरंडोल तालुक्यात पिंप्री बुद्रुक फाट्यावर घटना
एरंडोल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पिंप्री बुद्रुक फाट्यावर ट्रकने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीवरील महंत ठार झाले तर तरुण जखमी झाल्याची घटना गुरुवारी दि. २१ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील पिंप्री बुद्रुक येथील कबीर मठातील महंत प्रियरंजनदास (वय ३५ वर्ष) हे अपघातात मृत्युमुखी पडले आहे. महंत प्रियरंजनदास आचार्य हे बंगळुरु येथील कबीर पंथी धार्मिक कार्यक्रम आटोपून पिंपरी बुद्रुक येथील कबीर मठात परतण्यासाठी पिंपरी बुद्रुक फाट्यावर उतरले होते. त्यांना नेण्यासाठी प्रवीण नारायण पाटील हा तरुण दुचाकी घेऊन आला होता. महंत प्रियरंजनदास आचार्य दुचाकीवर बसले, तोच समोर भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात महंत हे जागीच ठार झाले. तर प्रवीण गंभीर जखमी झाला असून त्याला एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महंतांच्या निधनामुळे कबीरपंथी नागरिकांमध्ये शोककळा पसरली.
वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे नागरीक संतप्त होत रस्त्यावर उतरले. जमावाने महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली. यावेळी तहसीलदार प्रदिप पाटील, पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी संतप्त ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर एक तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यांच्या या अपघाती निधनामुळे कबीर पंथी नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. महंत प्रियरंजनदास हे जवळपास गेल्या चार वर्षांपासून पिंपरी बुद्रुक येथील कबीर मठात आचार्य म्हणून सेवा देत होते.घटनेप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.