जामनेर तालुक्यात पिंपळगाव चौखांबे येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पिंपळगाव चौखांबे येथील २३ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या आईने सासरच्या मंडळींवर शारिरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप करत फत्तेपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ज्योती साहेबराव इंगळे (कोळी) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी शितल विजय विचवे (वय २३) हिने दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी पिंपळगाव चौखांबे येथील रमेश नारायण पवार यांचे शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. मृत शितलला लग्नानंतर दोन महिने सासरच्या मंडळींनी चांगली वागणूक दिली. त्यानंतर मात्र सासू जनाबाई विचवे, ननंद स्वाती राजेंद्र साळुंखे (जळगाव) व पती विजय विचवे नेहमीच तिच्या चारित्र्यावर संशय घेत असत शारिरिक व मानसिक छळ करून दमदाटी व मारहाण करत असत. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केलेली आहे. याबाबत फत्तेपूर पोलीस ठाण्यात तिघा संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि अंकुश जाधव करीत आहे.