जळगाव शहरातील महावितरण कार्यालयजवळची घटना, दोघे ताब्यात
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील तुकारामवाडी येथील एका गुन्हेगारावर जिल्हा प्रशासनाकडून “एमपीडीए” अंतर्गत कारवाई झाल्याचा राग मनात ठेवून तसेच जुन्या वादातून काही गुन्हेगार तरुणांनी सोमवार दि. १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजता थैमान घातले. एका तरुणावर शस्त्राने वार करून त्याचा निर्घुण खून केला तर त्याच्या भावासह दोघांवरदेखील प्राणघातक हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
विशाल रमेश बन्सवाल मोची (वय २६, रा. रामेश्वर कॉलनी,जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. आई, वडील यांच्यासह तो रामेश्वर कॉलनी येथे राहत होता. या प्रकरणी आकाश जनार्दन मोची (वय २६, रा.तुकाराम वाडी, जळगाव) याने फिर्याद दिली आहे. तो तुकाराम वाडी येथे परिवारासह राहतो. आकाश हा आई, वडील व भावासह तुकाराम वाडीत राहतो. मयत विशाल मोची हा आकाश मोची याचा चुलत भाऊ आहे. दोघेजण काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयजवळ वेल्डिंग दुकानात काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात.(केसीएन)दरम्यान सोमवार दि. १८ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास मयत विशाल मोची, आकाश मोची व आकाशचा मित्र रोहित उत्तम भालेराव हे घराजवळ गप्पा मारत बसले होते. त्यावेळेला अचानक वीज गेली. त्यांनी महावितरण कार्यालयाला फोन लावला. मात्र कार्यालयात फोन उचलत नसल्याने तिघांनी महावितरण कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला.
पोलन पेठेत महावितरण कार्यालयाकडे जात असताना रस्त्यामध्ये संशयित आरोपी भूषण मनोज अहिरे, पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर, आकाश उर्फ खंड्या सुकलाल ठाकूर (रा. पिंप्राळा) यांच्यासह तीन ते चार जण हे रस्त्यात वाढदिवस साजरा करत असल्याचे त्यांना दिसले. मात्र त्यांनी दुचाकी न थांबता महावितरण कार्यालयाकडे निघाले.(केसीएन)यावेळी संशयित आरोपींनी विशाल मोची, आकाश मोची आणि रोहित भालेराव यांचा पाठलाग सुरू केला. मटन मार्केटच्या पुढे महावितरण कार्यालयाजवळ संशयित आरोपींनी मागे बसलेल्या विशाल मोची याला ओढून खाली पाडले.
त्यानंतर धारदार शस्त्राने मानेवर, डोक्यावर, छातीवर वार केले. तसेच इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागले. यावेळी ते जोरजोराने आरडाओरडा करून, “आमच्यावर एमपीडीए लावता का ?एकेकांना आम्ही मारून टाकू, आम्ही भूषण भाचा याचे साथीदार आहोत”असे म्हणून मारहाण केली. विशाल याच्या मानेवर, हातावर, छातीवर वार झाल्यामुळे तो जागीच कोसळला.(केसीएन)तर आकाश मोची आणि रोहित भालेराव हे तिथून पळायला लागले तर संशयित आरोपींनी दोघांना पकडून लाथा बुक्क्यांनी आणि चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केले आणि पळून गेले.
या वेळेला आकाश याने घरी फोन करून माहिती दिली. त्यानंतर विशाल मोची याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून विशाल याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला.(केसीएन)घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात नातेवाईक व मित्रांनी गर्दी करायला सुरुवात केली. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला घटनेची माहिती कळताच कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
दरम्यान, जळगाव शहरात खुनाच्या घटना सातत्याने सुरूच असल्याचे या निमित्ताने दिसून येत असून गुन्हेगारांवर पोलिसांचा अंकुश राहिला नाही काय असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित झाला आहे. सदर जखमी विशाल मोची, आकाश मोची आणि रोहित भालेराव हे यापूर्वी खून झालेल्या सुरज ओतारी याचे मित्र आहेत, याचाही राग मनात धरून संशयित आरोपींनी हा प्राणघातक हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एपीआय सचिन चव्हाण हे करीत आहे.