अजितदादांसमोर केवळ मागण्यांचा भडीमार, कार्यकर्त्यांच्या कपाळावर पडल्या आठ्या !
जळगाव (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे “समृद्ध खान्देश निर्धार मेळावा” रविवारी दि. १७ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला. या मेळाव्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून प्रतिभा शिंदे, भगतसिंग पाटील यांच्यासह अनेक आदिवासी बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षप्रवेशाच्या भाषणात प्रतिभा शिंदे यांनी केवळ मागण्यांचा भडिमार केल्यामुळे, प्रतिभाताई पक्षात केवळ प्रश्न सोडवण्याचेच काम करतील की पक्ष संघटनही वाढवतील की नाही अशी चर्चा पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.
रविवारी झालेल्या समृद्ध खान्देश निर्धार मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये प्रतिभा शिंदे, भगतसिंग पाटील, हारून शेख यांच्यासह काही आदिवासी बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशाच्या भाषणात प्रतिभा शिंदे म्हणाल्या की, समृद्ध खान्देशचा विकास हा नारा आम्ही हाती घेतला आहे. उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ आम्हाला स्थापन करून द्या, अशी आमची मागणी असल्याचे प्रतिभा शिंदे यांनी अजितदादांना सांगितले. तसेच इथला तरुण आयटी कंपन्यांमध्ये कामासाठी चेन्नई, पुणे, मुंबई, बेंगलोर आदी ठिकाणी जातो. मात्र जळगावतच त्यांना आयटी कंपनी येण्यासाठी पोषक वातावरण करून द्या. प्रशासन आम्हाला अजून न्याय देत नाही. कसेल त्याची जमीन यानुसार आम्हाला न्याय देऊन खान्देशातील ५५ हजार लोकांना जमिनी मिळाल्या पाहिजे.
त्यांना ‘पोखरा’सारखी योजना सुरू करा. एरंडोलला आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरू करा. जेणेकरून पश्चिम जळगावला फायदा होईल. भगवान एकलव्य यांच्या मुर्त्या आम्हाला बसविण्यास परवानगी द्या, अशा अनेक मागण्या या वेळेला प्रतिभा शिंदे यांनी केल्या. आम्ही झोळी घेऊनच अजितदादा तुमच्याकडे आलो आहोत असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये मात्र अस्वस्थता पसरल्याचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होते. पक्षवाढीसाठी प्रतिभा शिंदे यांच्यासह अनेकांना प्रवेश दिला खरा मात्र प्रतिभाताईंसह पक्षप्रवेश केलेले हे नेते व कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षवाढीसाठी व संघटन वृद्धीसाठी प्रयत्न करतील की नाही अशी चर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये रंगलेली दिसून आली.