जळगाव शहरातील द्रौपदी नगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील द्रौपदी नगरातील एका वृद्धाचे बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही चोरी दि. १५ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता उघडकीस आली. त्यानंतर दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाष सीताराम पाटील (वय ६८, रा. द्रौपदी नगर, जळगाव) हे कुटुंबासह राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, दि. १४ ते १५ ऑगस्ट या कालावधीत त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला. घरातील सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरून नेले.चोरी झाल्याचे लक्षात येताच सुभाष पाटील यांनी तात्काळ जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करत आहेत.









